शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

दिवाळीतील दिवे लागण !

 दिवाळीतील दिवे लागण !















दिवाळी गुंजेला,
माझ्या आजोळीच होत असे,
पुसद जवळचे हे छोटेसे गाव.
गढी आणि तिथले चार वाडे.
लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला आजी-मामी संध्याकाळी दिवे लावत.

तीन मोठ्या परातीमध्ये सगळ्या पणत्या ..

पेटवत एक एक पणती ठराविक ठिकाणी ठेऊन यायची.

कधी आम्हीही हे काम हौसेनं करायचो. पण नेमकी कुठली तरी जागा राहून जायची
पणती ठेवणं विसरून जायचं.

पणत्या लावून आलो की ! विचारायची .. उंबरापाशी लावली? हौदाजवळ? विहिरीपाशी ?
हो हो म्हणताना एखादं ठिकाण राहून जायचं ..
पुन्हा तिथे जाऊन पणती ठेवून यायची .. जवळपास पन्नास एक दिवे लागायचे
गढीच्या प्रवेशापाशी असलेल्या चांद खान महाराज पीरापासून ते
बाजूस असलेल्या उकिरड्या पर्यंत.
वेगळी गंमत ..

गढीही तशी उरली नाही,

आजी गेली, मामा देखील कितीतरी वर्षांपूर्वी पुसदला स्थायिक झाला,
दिवाळी विरली ती कायमची. मात्र तसे दिवे-पणत्या लावण्याचा परिपाठ अजूनही आहे.
तो इथे औरंगाबादला.. आता आई विचारते ..
जवळ लावला? बेलापाशी ? गच्चीचे दार .. आणि आवळी जवळ?
एक तरी जागा राहतेच जिथे विसरायला होतं !
अर्थाने दिव्यांचा सण होतो..
पाच पणत्या लावाव्या ना !
... घरातल्या मोठ्यांना कोण सांगणार !
ते वास्तुपुरुषाची जागा
अंगणातील मुख्य दार ते मागच्या
सदृश जागेचे दार ..
दिवे पेटले पाहिजे...
उजेड दिसला पाहिजे.
समाधान... समाधान कशाचं... ?
? खूप पणत्या लावल्याचं ?
(!) -परंपरा जतनाचं, की ...
समाधान असतं नक्की !
दिवाळीचा शेवटचा दिवस
आठवण घेऊन आला.

***

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

 प्रश्न सावडतो आहे...

(काव्य नाही प्रश्नांची लगोरी)

चिंता.. आता जगणार कसा याची,

की चिंता मरणार कसा याची?

छताला भिंतींनी सावरून धरलंय

की, छतानेच दिलाय आधार भिंतीना ?

‘समजुतीच्या आधारे’ जगणारे खूप झाले,

पण त्यांची ‘समजूत’ काढणारे कुणी नाहीच का ?

देणारे असतात तर घेणारेही असणारच,

पण इथे फक्त घेणारे असले तर देणारे कोण?

घरातली माणसं खरंच जवळ आली

की, ही फक्त ‘सोय’ काही काळाची?

चिमणीला दाणे टाकणारे हात नेहमीचे

की, कुणी पारधी फेकतोय मजबूत जाळे ?

माणसातल्या ‘माणसाची’ ओळख पटतेय

की, माणसा माणसात दुही जास्त पेटतेय?  

समाजाची दरी सांधणारी ही अवस्था आहे

की, दरी वाढवणार ही व्यथा म्हणायची ?

संकटे येताना एकटे येत नाही म्हणे

पण जाताना ते कसे जाते कुणास ठाऊक ?

मागून मिळाल्या दानाला म्हणायचं कृपा !

की कृपा म्हणजे न मागता मिळालेले मुठभर धान्य ?

कोण वार करतोय कोण करतोय प्रतिकार,

आता आधार दिला जातोय का उधार ?

मान्य की प्रश्नांची गर्दी खूप झाली..

त्यांचे सोशल distancing करेनही

पण उत्तरांची लस पाहिजे..

प्रश्न “अं त र” ठेवल्याने संपणार नाहीत..

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

CIVIC VIRTUE च्या शोधात!

CIVIC VIRTUE च्या शोधात!



सोशल मिडियातून विष पेरलं जातंय विष...अनेकजण तर ठेका घेतल्याप्रमाणे पोस्टचा रतीब घालतात. अतिरेकी वापरला जाणारा हा मिडिया आणि यातून झिरपत जाणारे उथळ विचार, सरते शेवटी आपल्याला कुठे नेणार या विचाराने डोकं भन्न होऊन जातं. तुमचं ही होत असेल पण तुम्ही दुसऱ्याच  क्षणी ते झुकागारून स्वत:ला कुठेतरी किंवा  अन्य विचारात गुंतवून घेताय. उथळ अविवेकी विचारसरणी, उतावीळ पणे व्यक्त होणारी माणसं, संयमी वृत्तीचा लोप..हे इतकं व्यापलंय आणि अशांचा समूह म्हणजेच तर समाज..! समाज आता या दिशेने प्रवाहित झालाय..तुम्ही प्रयत्न करा तो थांबणार नाही. त्याला तमा नाही, तो फक्त आणि फक्त स्वत:ची चांगली –वाईट मतं समोरच्यावर थोपवू पाहतोय. यातून त्याला मिळणार आहे एक आनंद व्यक्त होण्याचा आणि उन्माद - वर्चस्वाचा !

याचा उद्रेक होत होत एकवेळ अशी येणार की या दुहीतून सगळाच समाज विखुरला जाईल. ठिपक्यांची रांगोळी बिघडते ..रेषा सरळ येत नाहीत कारण ठिपके देतांना-टाकताना ते सरळ-सलग नसतात..तेच होऊ बघतंय..समाज म्हणून सगळीकडे बिघडलेली ठिपक्यांची रांगोळी दिसतेय. भले तुम्ही वर्तमान स्थिती क्षणिक आहे म्हणा, पण ही पेरणी आहे, वरतून कितीही अलबेल वाटलं तरी खदखद रुजतेय..कधीतरी हा ज्वालामुखी जागृत होईल. त्यावेळी ? हा प्रश्न मनात वादळ निर्माण करत असताना एक शब्द प्रखरतेने समोर येत होता आणि त्यानिमित्ताने व्यक्त व्हावं वाटलं.

CIVIC VIRTUE हा शब्द-याचा अर्थ अनेक वर्षांपासून डोक्यात घोळतोय.तो आज तुमच्याही समोर ठेवावा वाटला, “सिव्हिक व्हर्च्यु” – समाजाच्या यशस्वी वाटचालीसाठी चंगल्या सवयी-रितींची पेरणी, ही संकल्पना सिटीझनशिप अर्थात नागरिकत्वाशी संलग्न आहे, जुळलेली आहे. “सिव्हिक व्हर्च्यु” समाजाच्या सार्वत्रिक कल्याणासाठी-भल्यासाठी  नागरिकाचे डेडीकेशन.. Civic virtue is the harvesting of habits important for the success of the community.

नागरिकाची - प्रसंगी वैयक्तिक मतं बाजूला ठेवत समाजहित बघून होणारी कृती-वर्तणूक-अभिव्यक्ती ! राजकीय फिलोसोफीच्या कोनातून विचार केला तर “सिव्हिक व्हर्च्यु” म्हणजे नागरी आणि राजकीय व्यवस्था कार्यप्रवण-सुरळीत राहावी यासाठीच्या सदगुणांचा वापर!  (राष्ट्र, राज्य, शहर इ. या क्रमाने) समाज उन्नतीच्या कार्यात सक्रीय सहभागी होणं. किमान आवश्यक अशा कृतीमध्ये सहभाग नोंदवणे (हा या शब्दाच्या व्याख्येत  समाविष्ट  एक पैलू ) हा सहभाग म्हणजे मग नियमित कर भरणाही असू शकतो, वाहतुकीचे नियम पाळणे किंवा आज कोरोनाच्या निमित्ताने मा. पंतप्रधानांच्या आवाहनाला मिळणारा पाठींबा देखील असू शकतो.  ही एकाने करण्याची कृती नाही... तर अशा अनेकांचा मिळून जो समूह निर्माण होत जातो ते म्हणजे सामाजिक सहकार्य..civic virtue ! याची पेरणी समाजात होणे गरजेचे आहे...ती झाली तर सुदृढ –सकारात्मक समाजाची निर्मिती होईल. यासाठी न्यायाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच प्रामाणिकवृत्तीला देखील. आजच्या परिस्थितीत घडणे अशक्य वाटत असले तरी अगदीच असंभव नाही ..त्यादृष्टीने कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांनी ती साध्य होईल. पण मुळात नागरी समूह सुजाण होणे अभिप्रेत आहे.

सुरुवात झाली नाही का ? तर झालीय ..पण हे सगळे वैयक्तिक पातळीवर, या म्हणजे जे समाजहिताचे काम करतात, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी पुढे येत असतात, अशांची ऐक्य प्रक्रिया घडणे गरजेचे आहे..अशांनी कुठेतरी संवादातून-संपर्कातून एक होत राहणे गरजेचे आहे, जेव्हा ही संख्या तुलनेने वाढीस लागेल, एक लक्षणीय स्थितीत येईल तेव्हा “सिव्हिक व्हर्च्यु” संकल्पना साकारली जाईल जी आज व्यक्तिगत पातळीवर आहे ..म्हणून ती नाही असे जाणवू शकते.

थोडक्यात नागरिकांची समाजातील involvement – सहभाग आणि हा देताना नैतिक मुल्यांची जपणूक , ही संकल्पना नागरिकांना त्यांच्या समाजाशी बांधून ठेवणारी आणि त्यांना आपसातील जबाबदारी समजावून सांगणारी. समज निर्माण होताना समाजाच्या भल्यासाठी सगळ्या भल्या विचारांच्या माणसांनी एक होण्याचा निश्चय करत वाटचाल सुरु होणे म्हणजे “सिव्हिक व्हर्च्यु” ची संकल्पना रुजणे..ही आज काळाची गरज आहे.  (यात अभ्यासक आणखी मुद्दे जोडू शकतील. पण कुठेतरी या विचारांना सुरुवात व्हावी . ही संकल्पना नेमकी समोर यावी यादृष्टीने मी ब्लॉगवर टाकले आहे. )

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

Ctrl+S : Its a grt idea!

Podcast link below

https://open.spotify.com/episode/0mFvxesEiWWn6DJ3vZPrgF?si=iCAtq3hHSm-fqqrFxNAKAA           

         धीकाळी आपल्याला छोट्या-मोठ्या शहरात टायपिंग इन्स्टिट्यूट दिसत. नव्वदीच्या दशकापर्यंत सुरु होत्या, दरम्यान आपल्याकडे संगणक युग विस्तारले, टायपिंग इन्स्टिट्यूट मागे पडत गेल्या. इथे टाईप होणारा कागद जपून ठेवावा लागे, कारण त्या यंत्रात सेव्ह करण्याची सोय नव्हती. नव्वदच्या सुमारास मी तरुण भारतमध्ये दाखल झालो तेव्हा डीटीपी सेक्शनला असलेल्या संगणकावर शिकण्याची संधी मिळाली, त्यावेळी अबॅकसचे आणि इतर संगणक होते, किंमत साडेतीन लाख आणि वरच. संगणकाला मेमरीची तशी सोय नव्हती जी आता आहे, फ्लॉपी असायच्या ३६० केबीच्या. आधी संगणकात कंपोज करायचे, मग फ्लॉपी टाकून बूट करायचे, दुसरी फ्लॉपी टाकून सेव्ह करून घ्यायचे...अर्रर इतकं क्लिष्ट होतं ते ! (अर्थात आता ते वाटतंय, तेव्हा नाही) 

             हे लिहिता लिहिता सहज आठवलं, चंद्रावर उतरलेलं पाहिलं अपोलो स्पेसक्राफ्ट होतं ना, त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्टोरेज क्षमता होती ६४ केबी. त्याच काळात २० एमबी पर्यंतची हार्डडिस्क आली. मग पुढे सगळं वाढत गेलं..आता तर विचारायलाच नको. शिवाय कीबोर्डवर ज्या दोन keys हाती आल्या, त्यांनी जुनं सगळं वाचता, बघता येतंय. Ctrl आणि S ! मेमरी मध्ये साठवण्याची सोय ही मला वाटतं जगातील सर्वोत्तम सुविधा आहे. यामुळेच मेमरी जेवढी जास्त तेवढा आनंद अधिक आणि त्याचा उपयोगही जास्त. जगताना माणसाच्या मेमरीत काय काय साठवलं जातं नाही ? फक्त कोणती फाईल कोणतं फोल्डर कुठे आहे, ते कधी उघडावं आणि त्याचा उपयोग कसा करावा हे मात्र रॅमवर अवलंबून आहे तसंच  ते प्रोग्रामिंगवरसुद्धा डिपेंड आहे. आपला मेंदूची क्षमता सुमारे २.५ पेटाबाईट, अगदीच सोपं करून सांगायचं तर १६ जीबी ची मेमरी असलेले दीड लाखापेक्षा जास्त फोन. (१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट आणि १ टेराबाईट -१००० जीबी)  बघा ! कुठल्या कुठं जातोय विषय. टायपिंग   इन्स्टिट्यूट ते चंद्रावरचे यान आणि थेट तुमची-माझी मेमरी.

            या मेमरीतील काही घटना, प्रसंग, विचार मांडण्यासाठी हा ब्लॉग. आज संगणकाच्या मेमरीत काही सेव्ह करायचं तर काम करताना न चुकता Ctrl+S करावं लागतं, असं आपलं-आपल्या मेंदूचं होत असेलच की, आपल्याच नकळत Ctrl+S दबत असणार आणि अनेक बाबी सेव्ह होतच असणार. या सेव्ह केलेल्या गोष्टी पुन्हा स्क्रीनवर आणतोय.

            कंट्रोल + एस महत्त्वाचं! या दोन keys म्हणजे आपल्याही जगण्याचं एक तंत्र. गरज असलेलं साठवायचं, साठवलेलं आठवायचं, आठवलेलं पाठवायचं किंवा चेक सारखं वठवायचं. आपला मेंदू तर संगणकाच्या कितीतरी पुढे आहे, कारण इथे संगणकाच्या सगळ्या keys सोबत आणखी एक कीआहे ती भले बोर्डवर इतर keys सारखी सामान्य दिसत असली तरी प्रोग्रामिंग होताना तिचे functioning अफलातून आहे. ‘E’- emotions ! या मुळे आयुष्यातील कंट्रोल + एस ला एक गंमत आहे, एक रंगत आहे. कल्लोळ आहे. आपसूक कळ न दाबता मेंदूचं हे function सुरु होतं. कधी तरी  Ctrl+S केलेलं चटकन समोर येतं हे कुठे तरी forward होतं. चेहऱ्यावर, कृतीतून, विचारातून आणि शब्दातून!

            हे होताना असतो एक संदर्भ भूतकाळात घडलेल्या घटनांचा, एक धागा वर्तमानातला. कधी अस्वस्थ करणारा तर कधी आश्वस्त करणारा. शोध स्वत:चा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेत अशा Ctrl+S केलेल्या गोष्टी आपलं स्वत:चं स्थान बाळगून असतात. 

            आज घडीला forward असणं आणि forward करणं एवढंच महत्वाचं आहे की काय असं वाटण्याजोगा काळ आहे, forward असणं म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण केलाय? सहज खाजणारं अंग जसं आपल्याच नकळत आपण खाजवतो ना, तसं नकळत सोशल मिडीयावर forward करणं होताना दिसतं. मात्र नवी जनरेशन या platform वर वावरताना अधिक समंजस वाटते, त्यांच्या आधीचे या मिडीयावर वावरतात ते अतिउत्साही आहेत असं ठामपणे म्हणावं वाटतं. पिढी बदलताना platform बदलत आहेत, व्यक्त होण्याचे अंदाजबदलत आहेत, एफबी आणि whatsapp किंवा तत्सम मेसेजिंग आउटडेटेड, इन्स्टा, tweet, स्टेज उपलब्ध आहे. जिथे शब्दांना मर्यादा आणि क्रिएटीव्हिटी अमर्याद आहे. या सगळ्या मायाजाळातून Ctrl+S चा उपद्व्याप सुरु होतोय. या नोंदी वर्तमानाच्या, या नोंदी जगताना घडून गेलेल्या भूतकाळातील प्रसंगांच्या-माणसांच्या आणि वस्तूंच्याही ! जगता जगता जपलेल्या आठवणींच्या या नोंदी, कधी काही प्रसंग तर कधी त्या घटनांच्या निमित्ताने भेटलेली माणसं. निसटलेले क्षण म्हणता येतील का ? म्हणता येतील, निसटले तरीही धरुन ठेवलेले ते क्षण, माणूस, सभोवताल न्याहाळताना दिसलेला चांगुलपणा, जाणवलेली संवेदना-वेदना आणि हो ! कधी त्या क्षणांच्या सहवासात निर्माण झालेला विचारकल्लोळ. हे सगळं Ctrl+S केलेलं इथे Ctrl+V करत, पेस्ट करत- forward करतोय जे दुसरीकडून आलेलं नाही.  

            

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...