शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

 

"He is wise like an angel
and adamant like a devil"
ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी
असे वर्णन करतात हिवाळ्याचे !
यंदा तर कहर झाला होता थंडीचा !
मराठवाडा कधी नाही ते एवढा काकडला !
**
सरती थंडी.. सरत्या आठवणी !
उबदार शालीत सांभाळलेल्या आठवणी-क्षण
आता थंडी ओसरताना, शाल बाजूला करताना..
या क्षणांना मिळालेल्या कोवळ्या उन्हांनी
एक प्रसन्नता बहाल केलीय.
**
गुलमर्ग .. टूर नेला आणि श्रीनगर करून
इथे आलो.. वाह... गेली दोन दिवस बर्फ पडलेला..
कॉटेज भवती तर बर्फाचं साम्राज्य,
आणि तो मुक्काम !
न विसरता येणारी थंडी, हिटरही किती काम करणार?
रजया तरी किती म्हणून मागवणार ?
रात्रीच्या जेवणानंतर दोनदा कॉफी झाली तरी
फरक नाही.. कसा बसा झोपलो
पहाटे चारला जाग आली आणि
खिडकीच्या तावदानावर आवाज ऐकू येऊ लागले,
बाहेर बर्फ पडत होता...
थंडी ला "कडाक्याची" म्हणणे सुद्धा कमी वाटावे
असा तो गारठा .. त्या पहाटे रूम केट्ल कितीदा
गरम केली आणि किती चहा झाला याची मोजदाद नाही.
ही देखील एक आठवण असू शकते.
**
दिवाळीच्या काळातील आजोळी अनुभवलेली
थंडी आठवणींच्या शालीत एक ऊब देणारी,
न्हाणी घर म्हणजे फक्त भिंती आणि वर आभाळ,
गंगाळातील चटका देणारं पाणीही कोमट
वाटणाऱ्या थंडीतील पहाटे चार-पाच वाजताचं अभ्यंगस्नान
आणि नंतरची हुडहुडी मजेदार असायची.
**
साताऱ्याला नवीन राहायला घरात आलो,
नोव्हेंबर महिना आणि येणे अपरिहार्य होते.
खिडक्यांना काचा लावायच्या राहिलेल्या,
मोठ्ठ्या खिडक्या कशाला केल्या असतील बरं ?
हा प्रश्न त्रयस्तासारखा आम्हीच एकमेकांना विचारला .
एक तर त्यावेळी त्या भागातील हे एकमेव घर,
त्यामुळे पूर्ण मोकळा परिसर , थंडीचा जोर अधिक!
लोखंडी टोपल्यात शेकोटी पेटवली..
नुसत्या जाळाकडे बघूनही ऊब !
त्यानंतर कितीतरी वर्ष प्रत्येक थंडीला
टोपलं, लाकडं -कोळसा आणि
नंतर घरभर धूर ठरलेला.
घरातली ही थंडी डोळ्यात पाणी आणणारी !
**
गंगोत्री परिसरात कॅम्पिंग करताना रोज पहाटेच उठावं लागायचं
कारण कॅम्प किचनची जबाबदारी (जेवण बनवायला कुक सोबत होते, पण कमी जास्त पडणारे साहित्य आणि सकाळीच ट्रेक सुरु होण्यापूर्वी मार्केटचा राउंड ठरलेला. यामुळे पाच साडेपाचला दिवस सुरु व्हायचा ) जून असला तरी तिकडे थंडी भयंकरच. तशात भल्या पहाटे उठून टेन्ट मधून बाहेर येणं जीवावर यायचं.. पण बाहेर आल्यावरचा माहौल आणि एक मोठ्ठा मग भरून समोर येणारा चहा.. आहाहा..!
अजूनही त्या दिवसातील सूर्योदयापूर्वीची बोचरी थन्डी आणि चहाच्या वाफा.. भुला नही अभी भी.
**
**
आपल्याकडे थंडी आली की, घरातील ज्येष्ठांना एक वेगळाच उत्साह असतो ! कशाचा ?
लाडू वगैरे ठीक आहे, पण घरात सगळ्यांनी स्वेटर, बाहेर पडताना मफलर घातले की नाही,
यासोबतच "कानाला काही बांधून जा!" ही प्रेमळ सूचना आणि ..
अनेक घरात बघत असतो..
देवळात जसं उत्सवांप्रसंगी गाभाऱ्यातील देवाला सजवलं जातं, नटवलं जातं.
घरी कृष्णाष्टमी, महालक्ष्मी आणि गणपतीत जशी दृश्ये दिसतात.
तसंच आमच्याकडे थंडीच्या दिवसांत आणखी एक दृश्य असतं.
तसं ते अनेकांकडेही असेलच म्हणा !
घरात गुरूंचे एक लाकडी कटआऊट आहे,
दर वर्षी थंडी आली की, आई त्या कटआऊटला
शाल पांघरते, कधी डोक्याला उपरणं बांधते तर कधी कानटोपीही घालते.
माहिती असते की ते लाकडी कटआऊट आहे,
माहिती असतं की, देव दगडाचा आहे..
पण तरी एखाद्या माणसासाठी,
घरातील चालत्या बोलत्या व्यक्तीसाठी , प्राण्यांसाठी
केली जाणारी कृती जेव्हा मूर्तीसाठी केली जाते
तेव्हा चकित व्हायला होतं.
थंडीत डोक्याला-कानाला काही बांधून जा
म्हणणारी ज्येष्ठ पिढी .
सश्रद्ध भावनेतून थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून
मूर्तीलाही कानटोपी-शाल, उपरणं पांघरणारी
ही मंडळी बघितली की,
पटतं बाहेर कितीही थंडी असली तरी
आपल्याकडे संस्कारांचा गाभारा मात्र ऊबदार आहे !

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...