रविवार, ३० जानेवारी, २०२२

रिक्षावाला शिताफीनं वळवतोय हँडल !

रिक्षावाला शिताफीनं वळवतोय 
आयुष्याचं हँडल !



रिक्षा चालवतानाच तो आपली कथा- व्यथा सांगत होता. जिद्दीचा तो प्रवास..रामनगर भागात राहणा-या रिक्षावाल्याला आपल्या आयुष्यात राम सापडला-अर्थ सापडला. स्वार्थ बाजूला सारत त्याने ' कर्म' केले त्याची कहाणी!

***

मागच्या आठवड्यात आम्ही एक वेगळीच गंमत केली,

बहिणीकडे जायचं होतं...गाडी चालवणं जीवावर आलं होतं.

जाणं भाग. ...ठरवलं आज रिक्षाने जाऊया.

मी खूप दिवसात रिक्षाने शहरातून प्रवास केला नव्हता, आज करावा म्हटलं. मग सहकुटूंब रिक्षा प्रवास झाला. जाताना आणि येताना. गाडी असूनही रिक्षाने आलो याचे बहिणीलाही नवल वाटलेपण आमचे स्वभाव बघता आम्ही अशा गंमती जमती आणि ऑड गोष्टी करणार हे तिनेही गृहीत धरल्याने यावर फार चर्चा झाली नाही.

परतीला आम्ही जालना रोडवर आलो, एक रिकामी रिक्षा दिसली ..हात केला , तो थांबला. तसे आम्ही साता-यात येणार का म्हणताच त्याने मान हलवत खूण केली. आत बसलो तिघेही.

रिक्षा स्वच्छ आणि चालकही गणवेशात. आतमध्ये लायसन्स फोटोसह लटकवलेले..नाव फोन नंबरसह.

**

नाव तर कळलं होतं. साता-याला जायला पंधरा-वीस मिनिटं लागणार होती. संवादाला सुरूवात झाली.

हळू हळू तो खुलत गेला..आणि एका जिद्दीचा

हरता आयुष्याला भिडलेल्या,

आपल्या नव्या पिढीसाठी

मोठं स्वप्न डोळ्यात घेऊन

रोजचा दिवस साजरा करणा-या

माणसाचा परिचय झाला !

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवताना

तेवढाच कुल राहणारा रिक्षावाला कळला.

सामान्यांत असलेली ऊर्जा जाणवली.

सहा बहिण भावंडांपैकी हा एक, जालना जिल्ह्यातील एका खेड्यांतून आलेला. वडील कुठेसे नोकरीला होते, याचे शिक्षण अर्धवट राहिले, मग चिकलठाण्यातील एका कंपनीत काही वर्ष नोकरी केली. भावांना मात्र तो शिकण्यासाठी मदत करू लागला. स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडून...

नोकरी पटेना म्हणून मग एकाची रिक्षा भाड्याने चालवायला सुरूवात केली...शाळेची मुलं दोन शिफ्टमध्ये..आणि असं करता करता तीन वर्षापूर्वी त्याने स्वतःची रिक्षा घेतली..एक छोटासा प्लाॅट घेऊन दोन खोल्यांचं घर बांधलं..दरम्यान बहिणींची लग्न

भावांचे शिक्षण आणि याचा संसार सगळीच कसरत!

आज दोन लहान मुलं.

"मुलगा नववीला गेलाय, मुलगी बारावीला. तिला शिकवतोय..पी.आय. करायचंय..पोलिसात जाणार!" हे सांगताना तो जेव्हा मागे वळून माझ्याकडे बघत होता . तेव्हा त्याच्या डोळ्यात एकाचवेळी कृतार्थता, चमक आणि स्वप्नं मला दिसली.

समाधानाने तो सांगत होता..

तरी एक खंत बोलण्यात होती,

मला स्वतःसाठी काही करता आलं नाही.

भावाला पस्तीस हजार पगाराची नोकरी आहे, त्याचा मुलगा शिकून पुढे पुण्यात आयटी करतोय..

भावाने आता मोठा प्लाॅटही घेतलाय.

मी अजून रिक्षा चालवतोय..

दैवाला दोष देता, आयुष्याचं हँडल शिताफीने वळवत येणारे प्रत्येक सिग्नल पाळतोय..

अॅक्सलेटरवरचा हात कायम आहे.

संधी येईल..यावी..वेगासाठी.

लढ मित्रा!

तू चांगलं केलंस ..चांगलंच होईल.



थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...