बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

दुभंगणारा प्रवाह - ओंजळीतील ओहोळ



एके दिवशी सकाळीच शेजारी घरी आले,
"अरे ! सुबह सुबह कैसे ?"
"बच्चे की शादी है.. आपका मनू कहां है ? "
'है .. ' म्हणत मी चिरंजीवाला आवाज दिला,
तो येताच याने त्याच्या हाती बॅग दिली..
" ड्रेस का कपडा है, शादी के पहले सिलाना
और दावत मे पहनके आना!"
असं मुलाला दटावत नमस्कार करून तो निघून गेला..
मग आपल्या रितीरिवाजाप्रमाणे
त्यांना सहकुटुंब बोलावून आहेर झाला..
ही देवाण घेवाण सुरु असते..
**
आणखी आमचे एक अजीज मित्र, समोरच राहतात,
ते न चुकता रमजान मध्ये खास बोलावतात,
इकडून दिवाळी फराळ जातो.
काही वर्षांपूर्वी आई आजारी होती,
नियमित फळफळावळ, सोबत ख्याली खुशालीचा
संदेश मिळत राहिला.
मी गावी गेलो की, आवर्जून त्यांच्या मुलांपैकी
कुणीतरी घरी चौकशी करून जातं ..
काही अडचण आहे का विचारतं !
**
सात -आठ वर्ष आमच्याकडे एक चाचा गाडीवर होते,
बालवाडीत असलेल्या माझ्या मुलाला कधी ते एकटेच
जाऊन आणत .. घरात कुणीच कधी काळजी केली नाही.
माझं लहानपण जाफरगेट भागात गेलेलं,
तिथे कधी बानूची आई भेटली तर कधी कुणी,
शाळेत एक मित्र होता, त्याला कॉमिक्सची खूप आवड खिजर नाव बहुदा. मला तेव्हा ते अप्रूप होतं, एवढे कॉमिक्स घेणे परवडत नव्हते, मग तो आग्रहानं मला घरी घेऊन जायचा आणि बाइंडिंग केलेले कॉमिक्सचे गठ्ठे वाचायला द्यायचा.. एक शिरीन होती, एकत्र डब्बा खात असू. हे दोन्ही मित्र पाचवीच्या आधीचे.
**
हे आज का आठवावं ?
दुभंगत जाणाऱ्या प्रवाहाची चिंता करावी,
की या छोट्या ओहोळांना ओंजळीत धरावं ?
काळजी आणि काळीज एक वेलांटीचा फरक !
पण बेबंध झालं की दोन्हीचा ठोका चुकतो.
आज समाज काय विकतोय ?
कोण खरेदी करतोय .. कोण बोली लावतोय..
आकलनापलीकडे जातोय आपण !

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...