बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

CIVIC VIRTUE च्या शोधात!

CIVIC VIRTUE च्या शोधात!



सोशल मिडियातून विष पेरलं जातंय विष...अनेकजण तर ठेका घेतल्याप्रमाणे पोस्टचा रतीब घालतात. अतिरेकी वापरला जाणारा हा मिडिया आणि यातून झिरपत जाणारे उथळ विचार, सरते शेवटी आपल्याला कुठे नेणार या विचाराने डोकं भन्न होऊन जातं. तुमचं ही होत असेल पण तुम्ही दुसऱ्याच  क्षणी ते झुकागारून स्वत:ला कुठेतरी किंवा  अन्य विचारात गुंतवून घेताय. उथळ अविवेकी विचारसरणी, उतावीळ पणे व्यक्त होणारी माणसं, संयमी वृत्तीचा लोप..हे इतकं व्यापलंय आणि अशांचा समूह म्हणजेच तर समाज..! समाज आता या दिशेने प्रवाहित झालाय..तुम्ही प्रयत्न करा तो थांबणार नाही. त्याला तमा नाही, तो फक्त आणि फक्त स्वत:ची चांगली –वाईट मतं समोरच्यावर थोपवू पाहतोय. यातून त्याला मिळणार आहे एक आनंद व्यक्त होण्याचा आणि उन्माद - वर्चस्वाचा !

याचा उद्रेक होत होत एकवेळ अशी येणार की या दुहीतून सगळाच समाज विखुरला जाईल. ठिपक्यांची रांगोळी बिघडते ..रेषा सरळ येत नाहीत कारण ठिपके देतांना-टाकताना ते सरळ-सलग नसतात..तेच होऊ बघतंय..समाज म्हणून सगळीकडे बिघडलेली ठिपक्यांची रांगोळी दिसतेय. भले तुम्ही वर्तमान स्थिती क्षणिक आहे म्हणा, पण ही पेरणी आहे, वरतून कितीही अलबेल वाटलं तरी खदखद रुजतेय..कधीतरी हा ज्वालामुखी जागृत होईल. त्यावेळी ? हा प्रश्न मनात वादळ निर्माण करत असताना एक शब्द प्रखरतेने समोर येत होता आणि त्यानिमित्ताने व्यक्त व्हावं वाटलं.

CIVIC VIRTUE हा शब्द-याचा अर्थ अनेक वर्षांपासून डोक्यात घोळतोय.तो आज तुमच्याही समोर ठेवावा वाटला, “सिव्हिक व्हर्च्यु” – समाजाच्या यशस्वी वाटचालीसाठी चंगल्या सवयी-रितींची पेरणी, ही संकल्पना सिटीझनशिप अर्थात नागरिकत्वाशी संलग्न आहे, जुळलेली आहे. “सिव्हिक व्हर्च्यु” समाजाच्या सार्वत्रिक कल्याणासाठी-भल्यासाठी  नागरिकाचे डेडीकेशन.. Civic virtue is the harvesting of habits important for the success of the community.

नागरिकाची - प्रसंगी वैयक्तिक मतं बाजूला ठेवत समाजहित बघून होणारी कृती-वर्तणूक-अभिव्यक्ती ! राजकीय फिलोसोफीच्या कोनातून विचार केला तर “सिव्हिक व्हर्च्यु” म्हणजे नागरी आणि राजकीय व्यवस्था कार्यप्रवण-सुरळीत राहावी यासाठीच्या सदगुणांचा वापर!  (राष्ट्र, राज्य, शहर इ. या क्रमाने) समाज उन्नतीच्या कार्यात सक्रीय सहभागी होणं. किमान आवश्यक अशा कृतीमध्ये सहभाग नोंदवणे (हा या शब्दाच्या व्याख्येत  समाविष्ट  एक पैलू ) हा सहभाग म्हणजे मग नियमित कर भरणाही असू शकतो, वाहतुकीचे नियम पाळणे किंवा आज कोरोनाच्या निमित्ताने मा. पंतप्रधानांच्या आवाहनाला मिळणारा पाठींबा देखील असू शकतो.  ही एकाने करण्याची कृती नाही... तर अशा अनेकांचा मिळून जो समूह निर्माण होत जातो ते म्हणजे सामाजिक सहकार्य..civic virtue ! याची पेरणी समाजात होणे गरजेचे आहे...ती झाली तर सुदृढ –सकारात्मक समाजाची निर्मिती होईल. यासाठी न्यायाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच प्रामाणिकवृत्तीला देखील. आजच्या परिस्थितीत घडणे अशक्य वाटत असले तरी अगदीच असंभव नाही ..त्यादृष्टीने कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांनी ती साध्य होईल. पण मुळात नागरी समूह सुजाण होणे अभिप्रेत आहे.

सुरुवात झाली नाही का ? तर झालीय ..पण हे सगळे वैयक्तिक पातळीवर, या म्हणजे जे समाजहिताचे काम करतात, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी पुढे येत असतात, अशांची ऐक्य प्रक्रिया घडणे गरजेचे आहे..अशांनी कुठेतरी संवादातून-संपर्कातून एक होत राहणे गरजेचे आहे, जेव्हा ही संख्या तुलनेने वाढीस लागेल, एक लक्षणीय स्थितीत येईल तेव्हा “सिव्हिक व्हर्च्यु” संकल्पना साकारली जाईल जी आज व्यक्तिगत पातळीवर आहे ..म्हणून ती नाही असे जाणवू शकते.

थोडक्यात नागरिकांची समाजातील involvement – सहभाग आणि हा देताना नैतिक मुल्यांची जपणूक , ही संकल्पना नागरिकांना त्यांच्या समाजाशी बांधून ठेवणारी आणि त्यांना आपसातील जबाबदारी समजावून सांगणारी. समज निर्माण होताना समाजाच्या भल्यासाठी सगळ्या भल्या विचारांच्या माणसांनी एक होण्याचा निश्चय करत वाटचाल सुरु होणे म्हणजे “सिव्हिक व्हर्च्यु” ची संकल्पना रुजणे..ही आज काळाची गरज आहे.  (यात अभ्यासक आणखी मुद्दे जोडू शकतील. पण कुठेतरी या विचारांना सुरुवात व्हावी . ही संकल्पना नेमकी समोर यावी यादृष्टीने मी ब्लॉगवर टाकले आहे. )

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...